चिपळूणात सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर ; खेर्डीसह सावर्डे येथे महिलांसाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांचा हिरमोड

0
119

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.
चिपळूण: तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ८३ ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच पदासह पुढे होणाऱ्या ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षण सोडतीनंतर बऱ्याच उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. यामध्ये खेर्डी ग्रामपंचायतीसाठी ओबीसी स्त्री राखीव आरक्षण तर सावर्डे येथे सर्वसाधारण स्त्री राखीव अशा महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण पडल्याने सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे आता सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे.
चिपळूण तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत सोमवारी येथील गुरुदक्षिणा सभागृहात तहसीलदार जयराज सुर्यवंशी व निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व समर्थक ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पूर्वी, चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्या होत्या. यामध्ये २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध तर उर्वरित ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये विशेष म्हणजे खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. येथील निवडणूक अटीतटीची होईल, अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र, सुखाई परिवर्तन पॅनलने एकतर्फी निवडणूक जिंकून खेर्डी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. यानंतर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यामध्ये सदस्य विनोद भुरण यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, खेर्डीच्या सरपंचपदासाठी ओबीसी स्त्री राखीव आरक्षण पडल्याने विनोद भुरण यांचे नाव आपोआप मागे पडले आहे. तर आता सुखाई परिवर्तन पॅनलप्रमुख कोणाला संधी देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरपंच पदासाठी चिपळूण तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी – धामणवणे, कळंबस्ते, कुंभार्ली, अनुसुचित जाती स्त्री वर्गासाठी ओमळी, देवखेरकी,
अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता – कळकवणे दादर, अनुसूचित जमाती – स्त्री राखीव ओवळी, नागरीकांचा मागास प्रवर्ग करता – पोसरे, गुढे, डुगवे, ढोक्रवली, धामेलीकोंड, आंबतखोल, कळवंडे, नांदगाव खुर्द, पाचाड, पोफळी, येगाव, रेहेळवैजी, चिंचघरी, वाघिवरे, पिलवली तर्फे वेळंब, मार्गताम्हाणे, मांडकी खुर्द,
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव – दळवटणे, अडरे- मांडवखरी, पिंपळी बुद्रुक, कोंढे, पिलवली तर्फे सावर्डे, शिरवली, कामथे, भिले, खांदाटपाली, कालुस्ते खुर्द, खेर्डी, बिवली, कौंढरताम्हणे, कळंबट, पिंपळी खुर्द, कामथे खुर्द,
सर्वसाधारण स्‍त्री राखीव – कोकरे, खेरशेत, नांदगाव, मांडकी, कापरे, कोसबी दहिवली खुर्द, दहिवली बुद्रुक, तिवडी, आकले, गाणे, मोरवणे, वालोटी, परशुराम, पेढे, निवळी, उभळे आगरगाव, कळमुंडी, मिरवणे, वडेरु, खंडोत्री, पेढांबे,, कोळकेवाडी, अलोरे, दोणवली, कुशिवडे, नांदिवसे, मुर्तवडे शिरगाव भूम ते बुद्रुक सावर्डे, हडकणी, पालवण, वीर-देवपाट, मालदोली, खडपोली,
सर्वसाधारण प्रवर्ग करिता – आगवे, गोंधळे, कुटरे, रामपूर, गुळवणे, तनाळी, आंबेरे बुद्रुक, निरबाडे, बोरगाव, कान्हे, कोंडमळा, खरवते, कापसाळ, लोणारी बंदर चिवेली, नागावे, फुरुस, मुंढेतर्फे चिपळूण, मिरजोळी, कात्रोळी, वहाळ, केतकी, दुर्गेवाडी, रिकटोली, नवीन कोळकेवाडी, मार्गताम्हाने खुर्द, आबिटगाव, करंबवणे, मुंढे तर्फे सावर्डे, तोंडली, वेहेळे, तळवडे, वालोपे, नारदखेरकी, कादवड, बामणोली, मालघर, रावळगाव, खोपड, गंग्रई असे आरक्षण पडले आहे.
चिपळूण शहरानजीकच्या कळंबस्ते येथे सरपंचपदासाठी अनुसूचित जाती आरक्षण पडले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष विकास गमरे यांची वर्णी लागणार आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात नशीब आजमावणाऱ्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. यामध्ये चिवेली लोणारी बंदर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदी विजयी झालेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, कादवड ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, मुंढेतर्फे चिपळूण येथून विजयी झालेले माजी जिल्हाध्यक्ष मयूर खेतले यांना सरपंचपदाची लॉटरी लागणार आहे. तसेच अन्य ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अन्य राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. तर चिपळूण तालुक्यात ६४ महिलांच्या हाती गावाच्या कारभाराची चावी येणार आहे.

*दखल न्यूज भारत*