अनुकंपा धारकांना नोकरित सामावून घेण्यासाठी आमरण उपोषण

135

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर-वाशिम जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील व शिक्षण संस्थेतील अनुकंपा धारकांना शासनाच्या प्रचलित शासन निर्णयानुसार तात्काळ नोकरीत सामावून घेण्यासाठी रविवार दिनांक 24 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुकंपाधारक संघाच्यावतीने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
शासन सेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे मात्र या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात असल्याने अनुकंपा पदभरती करण्यास दिरंगाई होत आहे प्रचलित शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या वीस टक्के पदे अनुकंपाची भरणे आवश्यक असताना प्रशासन मात्र भरती करण्यास दिरंगाई करत आहे. नोकरी अभावी अनुकंपा धारकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून होत असलेल्या दिरंगाईमुळे बरेच अनुकंपाधारक वयोमर्यादेतुन बाद झाले आहेत तर बरेच बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.अनुकंपा धारकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय लघुपाटबंधारे विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद यासह शिक्षण अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन वेळ प्रसंगी आंदोलन उपोषण करुण अनुकंपा पदभरती करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र शासन याकडे कानाडोळा करत असल्याने शासनाचे लक्ष वेधुन अनुकंपा पदभरती तात्काळ करण्याच्या मागणीसाठी अनुकंपाधारक संघाच्यावतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनेश घनगाव जिल्हा परिषदेचे निखिल मिसाळ स्वप्निल केळे राहुल खाडे, प्रीतम उलेमाले आदि अनुकंपाधारक आमरण उपोषणास बसले आहेत. सदर आमरण उपोषण अनुकंपाधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष किशोर अवचार यांच्या नेतृत्वात अनुकंपाधारक आमरण उपोषण करत आहेत आमरण उपोषणाला अभिजीत निंबेकर योगेश राठोड प्रफुल इंगोले सतीश भेंडेकर रवि गाडे ठाकरे इलियास खान पुरुषोत्तम जाधव भारत साबळे बांगरे यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील अनुकंपाधारक यांनी पाठिंबा दिला आहे. नोकरित सामावून घेईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार असल्याचे अनुकंपा धारक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर अवचार यानी सांगितले.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206