मुख्याधिकारी चा मुख्यालयाला खो शासनाच्या आदेशाचे उल्लंघन कारवाई करण्याची मागणी

76

 

सावली तालुका प्रतिनिधी
(सुधाकर दुधे )
सावली नगरपंचायतीचे विलगीकरण होऊन सन 2015 मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आली. या नगरपंचायतीला आत्तापर्यंत दोन मुख्याधिकारी लाभले परंतु विद्यमान मुख्याधिकारी या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून सावली मुख्यालयी राहत नसल्याने कारवाई करण्याची मागणी सावलीकराकडून होत आहे.
सावली नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आला. सध्या सावली नगराची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी यांच्यावरच आहे. सावली नगरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या कामांमध्ये नगराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. मागील चार ते पाच महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. त्यातच नगरातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांची तोडफोड झाल्याने पाण्याचा निचरा होत नसून तुटलेल्या नाल्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नगरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे तर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. मुख्याधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना शासकीय कामाकरिता लागणारे दाखले वेळेवर मिळत नाही त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता फवारणी केली जात नाही. हजारो रुपयाची फॉगिग मशीन कार्यालयात धूळखात आहे. कचरा व्यवस्थापनाच्या कामात दिरंगाई होत असून कचरा संकलनाची गाडी प्रत्येक प्रभागात वेळेवर पोहोचत नाही. मात्र अशाही परिस्थितीत मुख्याधिकारी या मुख्यालयी राहत नसल्याने सावलीकरांना गंभीर बाबीचा सामना करावा लागत असून मुख्याधिकारी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी मुख्यालयी राहण्याची मागणी सावली कराकडून केली जात आहे.

– कोट
सावली येथील मुख्याधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुख्याधिकारी मुख्यालयी राहणे गरजेचे असताना त्यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांचेवर कारवाई करण्यात यावी.
– रोशन बोरकर शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सावली