कोविड लस टोचल्यास आपल्याबरोबर इतरांचेही संरक्षण होईल : डॉ.अभय बंग गडचिरोलीमध्ये डॉ.बंग कुटुंबियांनी घेतली कोविडची लस

97

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : भारतात कोविडची साथ चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे त्यामूळे आपल्या बरोबर इतरांचेही संरक्षण होईल असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले. ते आज डॉ.राणी बंग यांचे समवेत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोविड लसीकरणासाठी आले होते. यावेळी त्यांनी सर्व सामान्यांप्रमाणे आरोग्य कर्मचारी यांचेसमवेत रांगेत राहून लसीकरण घेतले. उपस्थित इतर आरोग्य कर्मचारी अधिकारी यांचेशी संवादही यावेळी त्यांनी साधला. यावेळी डॉ.बंग यांनी जिल्हयातील सर्व आरोग्य कर्मचारी यांना जस जसा आपला नंबर येईल तस तसी लस टोचून घ्यावी असे आवाहन केले. या लसीकरणावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.

यावेळी डॉ.राणी बंग यांनी लस टोचल्यानंतर इतरांना लस घेणेबाबत आवाहन केले. त्या म्हणाल्या की, जिल्हयातील आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या असून कोविड लसीकरणाबाबत आमचा चांगला अनुभव आहे. कोणीही लसीबाबत गैरसमज करून घेवू नये. या ठिकाणी सर्व कर्मचारी अनुभवी आहेत. कोणीही लसीकरणाला घाबरू नये. भारतात लसीकरण खरतर इतर देशांच्या तुलनेत लवकर मिळत आहे. याचा लाभ सर्व लोकांनी संसर्ग थांबविण्यासाठी घेणे गरजेचे आहे. जिल्हयातील आरोग्य कर्मचारी यांना सद्या लसीकरणाच्या पहिल्या टप्यात कोविड लस टोचली जात आहे. आज डॉ.बंग कुटुंबियांचा नंबर आल्यानंतर त्यांनी लसीकरणाला हजेरी लावली. जिल्हयातील शासकिय व खाजगी कोविड विषयी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सद्या लस टोचली जात आहे.