शिवसेनेचा दणका, अदानी जादा बिलाची रक्कम व्याजासह परत करणार !

 

पंडित मोहिते-पाटील
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि.२४ : जादा वीज बिलामुळे सध्या नागरिक त्रस्त असतानाच आता त्यांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती तथा मा.आमदार विनोद घोसाळकर यांनी आज शुक्रवार दि.२४ जुलै २०२० रोजी अदानी विद्युत विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक कपिल शर्मा सीओओ वितरण, विजय डिसूझा, सजीवन नानू यांची भेट घेत जादा बिलाबाबतीत जाब विचारला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक संजय पाटील, मुंबै बँक संचालक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर तसेच नागरिक उपस्थित होते.

लॉकडाऊन कालावधीत अदानी कंपनीकडून आलेल्या जादा बिलसंदर्भातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी घोसाळकर यांनी ग्राहकांना आलेल्या सुमारे १०० अधिक बिलांचे पुरावे सादर केले. प्रत्यक्ष रिडींग न करता ग्राहकांना सरासरी बिले पाठविली जातात यामागील तर्कशास्त्रावरही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. यामध्ये गेल्या ३ महिन्यांपासून बंद असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना २.५० लाख रुपयांची बिले मिळाली आहेत. त्यामुळे विनोद घोसाळकर यांनी अदानी व्यवस्थापनाला बिलिंगबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले.

तसेच प्रवर्गनिहाय (वाणिज्यिक, घरगुती इ.) बिले पाठविली, तसेच या बिलांविषयी प्राप्त झालेली देयके आणि काही कालावधीत प्रलंबित पेमेंट्स याबाबतीत तपशील देण्यास सांगितले. या मॅरेथॉन बैठकीनंतर अदानी व्यवस्थापनाने वास्तविक रिडींग बिलांची रक्कम पाठविलेल्या अंदाजपत्रक रकमेपेक्षा कमी असेल तर, पुढील बिलात व्याजासह आकारण्यात आलेली ही जास्तीची रक्कम परत करण्यात येईल असे आश्वासन दिले.

तसेच ग्राहकांना ऑक्टोबर २०२० पर्यंत एप्रिल, मे व जूनमधील तीन महिन्यांचे बिल व्याजमुक्त ईएमआयमध्ये भरण्यास मान्यता देण्यात आली. वीज बिले न भरल्यामुळे ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही. एमईआरसीच्या निर्देशानुसार घरगुतीमध्ये इलेक्ट्रीसिटी शुल्कामध्ये सरासरी १०% आणि वाणिज्यिक २२% कमी केली गेली असून अदानी कंपनीने ती लागू केली आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सर्व व्यावसायिक आस्थापना ज्यांना अंदाजे बिले मिळाली आहेत, त्यांनी बिले भरली नसतील आणि ते अदानी हेल्पलाईनला दिलेल्या तक्रारींच्या आधारे सुधारित बिले भरू शकतात. सर्व व्यावसायिक आस्थापने ज्यांनी आपली बिले भरली आहेत, अदानी त्यांचे पैसे व्याजासह परत करतील. तसेच सर्व नागरिकांनी आपल्या बिलाच्या प्रती शाखेत पत्रांद्वारे जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अधिकारी ग्राहकांशी संपर्क साधून त्यांचे बिलिंग बाबतीत समस्या सोडवणार आहे.