गडचिरोली जिल्ह्यात एकाच दिवशी 58 जण कोरोनामुक्त कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे द्विशतक पुर्ण

 

रोशनी बैस , रोजा गाडपेली

गडचिरोली,(जिमाका),दि.24: काल रात्री 28 तर आज 30 अशा 58 रुग्णांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. यामूळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 235 झाली. तसेच आज नवीन 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये गडचिरोली येथील विलगीकरणातील 9 एसआरपीएफ जवान कोरोनाबाधित आढळले. भामरागड येथील 3 बाधित यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील एक डॉक्टर, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला पंचायत समितीचा अभियंता व ग्वाल्हेर येथून आलेल्या एका मजूराचा समावेश आहे. अभियंता व मजूर संस्थात्मक विलगीकरणात होते. याव्यतिरिक्त आरमोरी येथील एकजण तामिळनाडू येथून परतला होता तोही बाधित आढळून आलेला आहे. अशा रीतीने आज 58 कोरोनामुक्त व 13 नवीन बाधित आढळून आले.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एसआरपीएफचे 43 जवान, सीआरपीएफचे 11 व 4 स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त 235 झाले. तर सद्या सक्रिय कोरोनाबाधित 205 राहिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधित संख्या 441 झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या संख्येमध्ये गडचिरोली जिल्हा रुग्णालयासह धानोरा, एटापल्ली येथील कोरोना हॉस्पिटलचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दवाखान्यातून सोडताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, डॉ.दुर्वे, शंकर तोगरे तर तालुकास्तरावर डॉ. मुकुंद ढाबले, डॉ. अनुपम महेशगौरी, डॉ. किनलाके उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांना पुढील 7 दिवस विलगीकरणाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.