नाणारबाबत केंद्राकडून राज्य शासनाला अल्टीमेटम

0
96

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : नाणार प्रकल्प अनेकदा चर्चेत आला आहे काहींचा पाठिंबा तर काहींचा विरोध अशा वादात नाणार सापडला आहे तर प्रत्येक निवडणुकीत हा चर्चेचा विषय बनतो. नानार हा भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट राहिला आहे. तर शिवसेनेने अनेकदा या प्रकल्पाबाबत विरोधाची भूमिका घेतली आहे. पण आता नाणार प्रकल्पाबाबत दोन महिन्यात निर्णय घ्या अन्यथा हा प्रकल्प इतरत्र हलवू, असा अल्टीमेटमच केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. ते रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेले माजी आमदार प्रमोद जठार यांनी नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. कोकणच्या हितासाठी हा प्रकल्प होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणात रोजगाराची संधी उपलब्ध करूया, असा सल्लादेखील जठार यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना जठार पुढे म्हणाले की, नाणार प्रकल्पासाठी आम्ही आजही आग्रही आहोत. असे असतानाच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने राज्य सरकारला दोन महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे. नाणारबाबत दोन महिन्यात निर्णय घ्या अन्यथा हा प्रकल्प इतरत्र हलवूच असा इशाराच राज्य सरकारला दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे राज्य सरकारला याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सध्या दिसत आहे राज्य शासन याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

*दखल न्यूज भारत*