गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोट वनपरिक्षेत्रा अंतर्गत विकासपल्ली नियत क्षेत्रातील राखीव वनक्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्या युवकावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला मंतोष निमय बाला वय 31वर्ष रा. विकासपल्ली, असे आरोपी युवकाचे नाव असुन त्याला काल 22 जुलै रोजी अटक करण्यात आली

140

 

गडचिरोली:ऊल्लेखनीय असे की गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्रावर अवैध अतिक्रमण सुरू असुन एक लाख एकर पेक्षा अधिक वनजमिनीचे सपाटीकरण करून शेती केली जात असल्याची माहिती आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वनक्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. परंतु याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. काही बोटावर मोजता येतील एवढ्याच कारवाया झालेल्या असल्याचे समजते. सर्वाधिक अतिक्रमण होत असलेल्या तालुक्यांमधे मुलचेरा, सिरोंचा, चामोर्शी, एटापल्ली तालुक्यांचा समावेश आहे. सदर अवैध अतिक्रमण हे बाहेरून आलेल्या लोकांचे असल्याची माहिती आहे.

राखीव वनक्षेत्रावर अतिक्रमण करून काढलेली हीच ती शेती

प्राप्त माहितीनुसार मंतोष बाला याने विकासपल्ली नियत क्षेत्रातील खंड क्रमांक 1560 मध्ये 1.17 हेक्टर म्हणजे जवळ जवळ तीन एकर राखीव वनक्षेत्रावर अतिक्रमण करून त्या वनक्षेत्रातील नैसर्गिक झाडे कापून जागेची साफसफाई करून नागरटी केली व शेतीसाठी बांध्या काढल्या. या प्रकाराची काही जागृत नागरिकांनी वनअधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी मोका चौकशी करून अतिक्रमण करणाऱ्या आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मंतोष बाला यास अटक केली. सदर आरोपीला आज चामोर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायमूर्ती यांनी आरोपीस जामीनावर मुक्त केले आहे.

आरोपीने यापूर्वी सुद्धा जवळपास दहा एकर वन जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे समजते. या प्रकरणाचा योग्य तपास केल्यास घोट वनपरिक्षेत्रातील अनेक अतिक्रमणाचे प्रकरण समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सदरची कारवाई घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. टी. गोन्नाडे यांचे नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक पी. एम. वडेट्टीवार, पी. एस. घुटे, वनरक्षक के.एम. कुमरे, बि.डी. नागोसे, डी.एस. कायते, एस पी धानोरकर, नेहा मांदाडे, एम. व्ही. वटी, एस. वाय. बोदेले यांनी केली.