गडचिरोली जिल्हयात मान्सून अभावी भात रोवणी रखडली …. बळीराजा संकटात … कुठे दिलासा तर काहींना अजुनही प्रतीक्षाच…

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

गडचिरोली : धान पऱ्हे उगवून दीड महिन्याचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही रोवणी झाली नाही. जिल्ह्याच्या अनेक भागात ही शेती आहे. सिंचनाची साधने हाती असलेले शेतकरी रोवणी आटोपत आहेत तर वर पाण्याची शेती करणारे शेतकरी अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात दोन दिवसात तुरळक ठिकाणी पडलेल्या काहीशा पावसामुळे कुठे दिलासा तर काहींना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच दर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. त्यामुळे यंदा लवकर हंगाम झाला.

मात्र मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही अपेक्षित दमदार पाऊस झाला नाही. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांनी धान पऱ्हे उगवून रोवणीला सुरूवात केली. काही शेतकऱ्यांच्या रोवणीची कामे आटोपली. मात्र साधने नसलेले शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत. गडचिरोली तालुक्याच्या चुरचुरा, धुंडेशिवणी, अमिर्झा, कळमटोला, मरेगाव, चांभार्डा, मौशिखांब, देलोडा तसेच आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील अनेक गावांमध्ये २५ टक्के सुद्धा रोवणी झाली नाही.

अनेक शेतकऱ्यांनी अल्प मुदतीच्या धानाची लागवड केली आहे. दीड महिन्याचा कालावधी उलटल्याने १५ दिवसानंतर या धानाची अर्धी मुदत संपणार आहे. याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मिळेल त्या साधनाने तलाव, बोडी, नदी, नाले आदींचा आधार घेत डिझेलपंप, मोटारपंपद्वारे पाणी लावून धान रोवणीची कामे करीत आहेत. धानोरा तालुक्यातील रांगी, चातगाव तसेच अहेरी उपविभागातील अनेक गावातही धान रोवणी पावसाअभावी खोळंबली आहे. आठ ते पंधरा दिवसांत रोवणीयोग्य पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.

मालेवाडा परिसर अजुनही कोरडाच ;

मागील आठवड्यात आलेल्या पावसामुळे मालेवाडा परिसरात धान रोवणीची कामे सुरू करण्यात आली. परंतु पावसाने पुन्हा दडी मारल्याने रोवणीची कामे खोळंबली. या भागातील तलाव, बोड्या अद्यापही कोरड्याच आहेत. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी कर्ज काढले. या वस्तूंवर खर्चही केला. परंतु पावसाचा जम बसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात तीन दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाल्याने या भागातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांना मजूर मिळेनासे झाले आहेत. असे असले तरी पावसामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.