विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगावे – आमदार सहषराम कोरोटे यांचे प्रतिपादन विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार समारंभ

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत..।।
आमगाव ता.२३: सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे महत्व न समजल्यामुळे व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी जिल्ह्यात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षांकडे कल दिसून येत नाही. तेव्हा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी शासनाद्वारे वर्ग सुरु करण्यात यावे, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी करून अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगावे, असे आवाहन केले व बारावी बोर्ड परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार सहषराम कोरोटे व मित्र परिवार व विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.२३) येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात १२ वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव बबनसिंह ठाकूर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार,माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविकुमार अग्रवाल, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रामेश्वर शामकुवर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश उके, माजी सरपंच राजकुमार फुंडे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय खेतान, महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एस.टेंभुर्णे उपस्थित होते. याप्रसंगी बबनसिंह ठाकूर, नरेश माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करून त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी १२वी बोर्ड परीक्षेत सुष्मिता माहापात्रा ही तालुक्यात प्रथम, आकांक्षा वाघमारे व अविनाश पाथोडे हे दोघेही तालुका द्वितीय, मधुमिता माहापात्रा ही तालुक्यात तृतीय, एमसीव्हीसी विभागातून ऑटोमोबाइल टेक्नाॅलाॅजीचा अमित मेश्राम हा नागपूर विभागातून प्रथम, इलेक्ट्रीकल टेक्नाॅलाॅजीतून हितेश उपराडे जिल्हा प्रथम, अकाॅउंटिंग ॲन्ड ऑफिस मॅनेजमेंटमधून शितल मेंढे जिल्हा द्वितीय, वाणिज्य शाखेतून लक्षिता गावराणे जिल्हा प्रथम व कला शाखेतून रजनी पटले ही तालुक्यात तृतीय आल्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार सहषराम कोरोटे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संचालन प्रा. पी.आर. दारव्हनकर यांनी केले. प्राचार्य डी.एस.टेंभुर्णे यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे आभार मानले.