झरी तालुक्यातील शिक्षकांसाठी ऑन लाईन कार्यशाळा

 

वणी :- परशुराम पोटे

पंचायत समिती झरी (जामनी) यांच्या तर्फे लॉक डाउन च्या काळात शिक्षकांना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण व्हावे यासाठी झरीचे विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे यांच्या पुढाकाराने मूळ वणी चे पण मागील 15 वर्षांपासून सिंगापूर येथे आय.टी.कंपनीत मॅनेजमेंट डायरेक्टर असलेले अजय पिंपळशेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन वर्क शॉप घेण्यात आले आहे.
या वर्क शॉप मध्ये ऑनलाईन विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, ऑनलाईन गृहकार्य देणे, विविध प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करून चाचणी गुगल वर कशी तयार करायची हे अतिशय बारकाईने समजावून सांगण्यात आले.
झरी ( जामनी) हा तसा आदिवासी बहुल मागासवर्गीय भाग म्हणून ओळखल्या जातो. या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी वणी पंचायत समिती मध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेले प्रकाश नगराळे यांनी वणी पंचायत समिती मध्ये शिक्षकांसाठी माजी शिक्षण सचिव नंदकुमार, प्रतिभा भराडे यांच्या सारख्यानां वणीत बोलावून शिक्षकांमध्ये नवीन चैतन्य निर्माण केले होते. त्यांचे स्थानांतर झरी पंचायत समितीमध्ये झाल्यानंतर तेथेही शैक्षणिक परिवर्तन करण्यासाठी त्यांनी या माध्यमातून सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे झरी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यशाळेचा लाभ झरी तालुक्यातील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला आहे.