संगमेश्वर तुरळ येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
161

 

प्रतिनिधी / प्रफुल्ल रेळेकर.

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ तेलीवाडीतील नितीन राजेंद्र चव्हाण (वय २२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन चव्हाण हा घराजवळ असणाऱ्या गोठ्यामध्ये आपल्या गुरांना नेहमी रात्री बघण्यासाठी जात असे. सोमवारी रात्रीही तो गोठ्यात गेला होता. मात्र, तो घरी परत आलाच नाही. सकाळी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्या मंडळींना निदर्शनास येताच या घटनेची माहिती पोलिस पाटील वर्षा सुर्वे यांनी संगमेश्वर पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. या बाबत घटनेचा अधिक तपास संगमेश्वर पोलिस करीत आहेत.

दखल न्यूज भारत