जिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथील शिक्षक वृंदाचा अनोखा स्तुत्य उपक्रम इयत्ता १ ली ते ७ वीच्या विध्यार्थ्यांसाठी “शाळा,बाहेरची शाळा”

0
237

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोरोना महामारीने देशातच नव्हे तर संपुर्ण जगात थैमान घातले असून,या महामारीमुळे व्यापारी वर्ग,शेतकरी वर्ग,सर्वसामान्य जनता,खाजगी क्षेत्र,सरकारी कार्यालये,निमसरकारी,शिक्षण क्षेत्र व इतर अनेकांना याचा फटका बसला आहे.त्यातच प्राथमिक शिक्षण,विद्यालयीन शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.त्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलून इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विध्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केल्या.
मात्र शिक्षणाचा पाया असलेल्या १ ली ते ८ वीचे वर्गच सुरू नाही.शिक्षणाचा पायाच मजबूत नसेल तर त्या शिक्षणाला काय महत्व म्हणावे.कोरोना महामारीमुळे इयत्ता १ ली ते ८ च्या विध्यार्थ्यांना अजूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.मात्र याला अपवाद म्हणून कोंढाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकवृंदानी इयत्ता १ ली ते ७ वीच्या विध्यार्थ्यांसाठी एक अनोखा व आगळा-वेगळा उपक्रम राबविला आहे.कोंढाळा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ७ व्या वर्गाची कोरोना अगोदरच्या काळात शाळा भरायची.सध्या स्थितीत कोरोनामुळे विध्यार्थ्यांसाठी मोबाईल वरती ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.मात्र ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने या विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्न विध्यार्थ्यांच्या पालकांसमोर व शिक्षकवृंदानसमोर येऊन ठाकला.त्यासाठी जिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथील अतिरिक्त पदभार असलेल्या मुख्याध्यापक देशपांडे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी शक्कल लढवली व “शाळा बाहेरची शाळा” सुरू केली.यात ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अशा विध्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना स्वाध्याय पुस्तिकेतील शिक्षणाचे धडे दिले जात आहे. तसेच ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत अशांना प्रशिक्षण देऊन पर्यायी स्वाध्याय प्रश्ने सोडविण्यास सांगितले जात आहे व किमान दोन तास नवोदय विद्यालयाची स्कालरशिपची तयारी सुरू केली आहे. यामुळे जेणेकरून विध्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होऊन एकही विध्यार्थी शिक्षणापासून मुकणार नाही.
“शाळा बाहेरची शाळा” या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेचे अतिरिक्त पदभार असलेल्या मुख्याध्यापक देशपांडे मॅडम,ढोरे सर,आदे सर,टेम्भुरने सर,निंबार्ते सर,चौधरी मॅडम,ठवरे मॅडम,जांभुळकर मॅडम व रामगुंडे मॅडम या सर्वांचे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे.