संसद एकदा वखराव म्हणतोय

0
136

संकलन हर्ष साखरे
राजपाट
सत्तेचा हाट
धर्माच्या नावाची बिजाई
रुजवू पाहणारे भांड
हे सगळं सगळं पोखराव म्हणतोय
मी शेतकरी आहे
संसद एकदा वखराव म्हणतोय

तुमच्या मोराचा दाणा
तुमच्या पोपटाचा चना
आम्हीच पीकवला आहे
तुमच्या दक्षिणेतील फळ फुलांची रास
आमच्याच बगिच्यातली आहे
हे सगळं सगळं तुम्हाला
सांगावं म्हणतोय
मी शेतकरी आहे
संसद एकदा वखराव म्हणतोय

वारल्या तोंडान
गाईला गौमाता
अन बैलाला बाप म्हणणारे तुम्ही
तुमच्या माता-पित्यांचा मीच पालक आहे
हे लक्षात आणून द्याव म्हणतोय
मी शेतकरी आहे
संसद एकदा वखराव म्हणतोय

सकाळचा नाश्ता
दुपारची न्याहारी
रात्रीचे जेवण
दिवसभर चाय,कॉफी,लस्सीतले
वाह वाह चे यौवन
अगदी सगळं सगळं
माझ्यापासून सुरू होतंय
हे तुला सांगावं म्हणतोय
मी शेतकरी आहे
संसद एकदा वखराव म्हणतोय

जय जवान जय किसान
स्वामीनाथन आयोग
आणतेस का नाही सांग
तुला जीडीपी च
जराही नाही रे भान
अर्थशास्त्राच्या प्रत्येक पानापानावर
आमच्यामुळेच आहे शान
हे तुला सगळं सगळं
सांगावं म्हणतोय
मी शेतकरी आहे
संसद एकदा वखराव म्हणतोय

आम्ही देहाची शेती केली
लोकशाहीला आई म्हटलं
पण तुम्ही पोसलेल्या
भांडवलशाहीच्या तुडतुडयाने
आमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह टाकलेत
म्हणून दिल्ली सर करावी म्हणतोय
मी शेतकरी आहे
संसद एकदा वखराव म्हणतोय

—सतीश डांगे
9421856264

ही कविता शब्दबद्ध केली आणि दिल्लीकडे कूच करू पाहणाऱ्या स्वातंत्त्र्यविर शेतकऱ्यांना समर्थन दिले.