कोंढाळा ते मेंढा नदिघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दयनीय अवस्था

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोंढाळा ते मेंढा नदिघाटाकडे जाणारा रस्ता हा वर्दळीचा रस्ता असून,या ठिकाणाहून आजूबाजूला शेतकरी बांधवांच्या शेत्या आहेत.याच रस्त्यावरून नदिघाटातून रेती उपसा करून गावोगावी जड वाहनांनी वाहतूक केली जाते.जड वाहतुकीमध्ये ट्रक,टिप्पर,ट्रॅक्टर,जे सी बी व इतर भले मोठे वाहनांनी वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावर खाच-खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
कित्येकवेळा गावकऱ्यांनी रस्त्याबाबत ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये विषय मांडून आपबीती सांगूनही याकडे काणाडोळा केल्या जात आहे.रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांच्या शेती असून,जड वाहनांच्या ये-जा करण्यामुळे उभी असलेली पिके यावर रस्त्यावरील धुळ बसुन पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असतात.काही शेतकऱ्यांच्या मते,पिकांची नुकसानभरपाई रेती घाट लिलाव धारकांनी दिली पाहिजे तसेच रस्ता दुरुस्त करून त्यावर डांबरीकरण करून द्यावे.
सध्याच्या घडीला रस्ता पूर्णपणे खराब झालेला असल्याने,बैलबंडी वा ट्रॅक्टर शेतात नेण्यासाठी जीवाची कसरत करावी लागत असते.तसेच पाऊस पडला की रस्ता दिसेनासा होऊन चिखलमय रस्त्यातून वाट शोधावी लागते असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यासाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून वा रेती घाट लिलाव धारकांकडून रस्त्याची दुरुस्ती होऊन डांबरीकरण करण्याची मागणी शेकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.