नियमांचे काटेकोरपणे पालन करा, पुन्हा लाँक डाऊन ची गरज पडणार नाही – तुकाराम मुंडे (नागपुर मनपा आयुक्त)

234

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: २१ जुलै २०२०
नागपुर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोव्हीड कोरोंटाईन सेंटर मध्ये जाऊन कोरोनाबाधित पेशंट शी थेट संपर्क साधुन त्यांच्या समस्या व प्रक्रृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी आपल्या फेसबुक वाँलवरुन नागपुरकरांशी भावनिक आवाहन केले.. ते आम्ही दखल न्युज भारत पोर्टल च्या वाचकांसाठी जसेच्या तसे घेऊन आलोत. ते काय म्हणालेत?

👇👇👇

कशासाठी….?

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यू पावणाऱ्यांचा आकडाही फुगत चालला आहे. याला कुठेतरी ‘ब्रेक’ बसावा यासाठी मनपा प्रशासन सातत्याने झटत आहे. मनपा आयुक्त या नात्याने या शहरातील एकही जीव कोरोनामुळे जाऊ नये, हाच माझा प्रयत्न आहे. यासाठी मी स्वतः मेडिकल आणि मेयो येथील कोव्हिड रुग्णालयाला भेट दिली. तेथील रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. रुग्णांशी बातचित केली. डॉक्टरांशी चर्चा केली. अजून काय करायला हवे, यावर मंथन झाले.

हा सर्व खटाटोप केवळ आणि केवळ प्रत्येक नागपूरकराचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठीच आहे. पण या सर्व प्रयत्नांना जोपर्यंत नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळत नाही तोपर्यंत या प्रयत्नांना अर्थ उरत नाही. ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत मिळालेल्या सवलतीकडे संधी म्हणून बघत घालून दिलेल्या नियमांचे पालन करा. आयुष्य राहिले तर भविष्यात सर्व काही करता येईल. फक्त आपल्या एका चुकीमुळे इतरांचे आयुष्य धोक्यात घालू नका. मास्कचा वापर असो, शारीरिक अंतराचे पालन असो, वाहनांसंदर्भातील नियम असो, या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर पुन्हा लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. म्हणून नियम पाळा आणि या शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी झटत असलेल्या मनपा प्रशासनाला साथ द्या, सहकार्य करा. कारण, प्रत्येक जीव हा अमूल्य आणि विशेष आहे. त्या प्रत्येक जीवाची सुरक्षा आणि काळजी आमच्यासाठी महत्त्वाची आहे.