‘प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघा’च्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपट्टू तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत !

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्युज भारत’

मुंबई (माणगाव), दि.३ : आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नुकतीच क्रीडा कोट्यातून तहसीलदार पदावर नेमणूक करण्यात आली असून ‘प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ’, माणगाव शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संघाचे संस्थापक-अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गोरेगावकर, माणगाव तालुकाध्यक्ष रिजवान मुकादम, तालुका संघटक प्रसाद देवलेकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ललिता बाबर यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून ‘प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघा’च्यावतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या ललिता बाबर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पी.टी.उषा’ व ‘कविता राऊत’ यांचा वारसा पुढे चालविण्याचे काम ललिता बाबर यांनी केले आहे. पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीपासून सुरूवात करून त्यांनी ‘मॅरेथाॅन’ स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सलग तीनवेळा त्यांनी ‘मुंबई मॅरेथाॅन’ जिंकली आहे.

‘मॅरेथाॅन’नंतर त्यांचं अनेकांना नावही माहिती नसलेल्या तीन हजार मीटर ‘स्टीपलचेस’ या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. या खेळातही त्यांनी आपला ठसा उमटविला. राष्ट्रीय विक्रम तर त्यांनी नोंदवलाच, पण जखमी असूनही ‘रिओ दी जानरो’ येथे सन २०१६ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचा पराक्रम केला. त्यांच्या खेळातील या योगदानांबद्दल त्यांना अर्जून पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्री’ व भारताच्या ‘युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालया’ने २०१५ मध्ये ‘स्पोर्टस पर्सन ऑफ दी ईयर’ या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

राज्य शासनाने यामुळेच क्रीडा कोट्यातून त्यांची ‘उपजिल्हाधिकारी’पदी निवड करण्यात आली आहे. सन २०१९ पासून त्यांचे विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्यांची माणगाव येथे परिक्षाविधिन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडू म्हणून काम करतांना पत्रकारांचे सहकार्य सातत्यांने लाभले असल्याची भावना ललिता बाबर यांनी व्यक्त केली.