कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीमध्ये 10 दिवस संचारबंदी?

राज्य शासनाला पाठविला प्रस्ताव

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीकरिता पंढरपूरातून येणाऱ्या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत प्रवेशासाठी परवानगी असून दिंड्या एसटीने आळंदीत ८ डिसेंबरला पोचणार आहेत. तर पोलिस प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी ६ डिसेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत भोसरी मॅक्झीन फाटा ते आळंदी आणि आळंदी पंचक्रोशीतील गावांमधे संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. आता कार्तिकी वारीसाठी आता राज्यशासनाच्या मार्गदर्शन सुचनावजा आदेश कधी येणार याची प्रतिक्षा प्रशासनासह, देवस्थान, वारकरी आणि ग्रामस्थांना लागली आहे.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी  (११ डिसेंबर) ला तर संजीवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी(ता. १३ डिसेंबर) ला आहे. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत यात्रा असून वारकऱ्यांचा मुक्काम आळंदीत राहणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे  पंढरपूरातून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या श्री. पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या तीन दिंड्यांना राज्य शासनाने पायी वारीऐवजी तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी वीस लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी दिली असून स्वतंत्र एसटीची सोय केली आहे. तीनही दिंड्या आठ डिसेंबरला पंढरपूरातून आळंदीत येतील आणि प्रतिपदेपर्यंत आठवडाभर आळंदीत राहण्यासाठी परवानगी आहे. दरम्यान सोमवारी(ता.३०)जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रशासकिय बैठक वारी संबंधात पुण्यात घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाच्यावतीने आळंदीत संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यामधे ६ डिसेंबर ते १५ डिसेंबर संचारबंदी पंढरपूरच्या धर्तीवर शिफारस केली. आळंदी शहरात माऊलीं मंदिरात आणि मंदिराच्या प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त राहिल. मंदिराकडे येणाऱ्यामार्गावर,प्रदक्षिणा रस्ता,शहर प्रवेश करणारे रस्तेही बंद केले जाणार आहेत. पुण्याहून आळंदीकडे येणाऱ्यामॅक्झीन फाटा,डुडुळगाव, चिंबळी फाटा,चाकण रस्ता,वडगाव रस्ता,मरकळ रस्तापूर्ण बंद राहिल. मरकळ औद्योगिक भागात जाणाऱ्याअवजड वाहनांसाठी पुणे नगर महामार्गाने लोणीकंद फाट्यावरून तर धानोरे हद्दीत जाण्यासाठी च-होली आळंदी बायपासचा वापर करण्याची शक्यता आहे.