वैद्यकीय चाचणीत अपात्र झालेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या आधारावर लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठवा – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री

 

वणी : विशाल ठोंबरे

प्रकल्पग्रस्त शेतकरी हा प्रत्येक प्रकल्पाच्या उभारणीसह यशस्वीततेसाठी महत्वाचा कणा असतांना त्यांना दुर्लक्षित करून प्रकल्प चालविणे हा प्रकल्पग्रस्तांवर अन्याय असल्याने सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात सन्मानजनक रोजगार व रास्त मोबदला मिळणे हा त्यांचा न्यायिक अधिकार आहे. असे असतांना वेकोलि च्या माध्यमातून काही प्रकल्पग्रस्तांना वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्यात आले परंतु या सर्व प्रकल्पग्रस्तांना शारीरिक क्षमतेच्या लाईट जॉब अथवा मासिक मानधन देण्यात यावे अशा सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे यांना बैठकीच्या माध्यमातून केल्या.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बैठकीला क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे, कार्मिक विभागाचे श्री मनोगरन व प्रकल्पग्रस्तांमध्ये विशाल मिलमिले, धनराज पिंपळशेंडे, अक्षय बल्की, निलेश घुगरूळ, मनोज खाडे, ऋषी रासेकर, स्वप्नील वासेकर, आशिष ठेंगणे, दिवेश देठे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
सदर बैठकी दरम्यान हंसराज अहीर यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या विषयाला अनुसरून न्याय मिळावा याकरिता महाप्रबंधक कार्यालयातून त्वरित सकारात्मक प्रस्ताव कोल इंडिया च्या मुख्यालयात सादर करण्याच्या सूचनाही केल्या. अनेक प्रकल्पग्रस्त आजही आपल्या रोजगार व मोबदल्याची प्रयत्नरत असतांना त्यांना शुल्लक कारणास्तव वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरविण्याचा प्रपंच हा चुकीचा असतांना या सर्व प्रकल्पग्रस्तांना मासिक मानधन अथवा लाईट जॉब मिळणे हा प्रकल्पग्रस्तांचा अधिकार आहे असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.