अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला रिक्षाने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला . तर रिक्षातील दोन जखमी प्रवाशांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हा अपघात मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारवांचीवाडी येथे घडला . दीपक दत्ताराम मांडवकर ( ३२ , रा . करबुडे , रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे . भाडे नसल्याने ट्रक चालक सागर प्रकाश जाधव ( २७ , सध्या रा . कारखांचीवाडी रवींद्रनगर , रत्नागिरी ) यांनी सोमवारी सायंकाळी ट्रक ( एमएच ०८ एपी ४९५९ ) कारवांचीवाडी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभा केला होता . त्यानंतर ते घरी गेले असता मंगळवारी पहाटे वाजता त्यांना एक फोन आला . फोन करणाऱ्याने तुमच्या ट्रकला रिक्षाने धडक देत अपघात केल्याची त्यांना माहिती दिली . त्यांनी ट्रक उभा केलेल्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना आपल्या ट्रकच्या पाठीमागे उजव्या बाजूला रिक्षा ( एमएच ४८ एन ८२६५ ) ने धडक देत अपघात केल्याचे पाहिले . या अपघातात चालक आणि रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिक्षाचालक दीपक मांडवकर यांना तपासून मृत घोषित केले . अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात केली आहे.