रत्नागिरी शहरात अतिक्रमण हटावला जोरदार सुरुवात.

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी:- नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी शहरात अतिक्रमण हटावला सुरुवात झाली आहे. मारुती मंदिर येथून खोके हटवून या कारवाईचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. अनेकदा अतिक्रमण, अनधिकृत टपऱ्या, बांधकामे हा विषय चर्चेला येतो अखेर काल सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारी अतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगरपालिका सज्ज झाली आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू झाली असून मारुती मंदिर येथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी, अग्निशामक व इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. मारुतीमंदिर पाठोपाठ शहरातील विविध ठिकाणी जाऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाई करण्यासाठी सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक नंदकुमार पाटील, मालमत्ता लिपिक किरण मोहिते, लिपिक जितू विचारे, नगर परिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कारवाईमुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूचा बहुतेक भाग मोकळा झाला आहे. त्यामुळेच पादचारी मार्ग, पार्किंग साठी असणारा भाग हा त्यासाठी वापरता येणार आहे.
नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या आदेशानुसार ही कारवाई कायम राहणार असल्याची माहिती आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी दिली आहे. ग्रामीण भागातून टोपलीतून भाज्या घेऊन येणाऱ्या भाजीविक्रेत्या महिलांना यातून सूट देण्यात आली आहे. कोणताही मुलाहिजा न बाळगता ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती राजन शेट्ये यांनी दिली आहे.
कारवाई तशीच चालू राहणार का? कोणाचा यावर दबाव आणला जाईल का? अनेक ठिकाणी करण्यात आलेली पक्की बांधकामे देखिल तोडले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सर्व गोष्टी पाहता हे होणे गरजेचेच होते अशी लोकभावना असल्याचे दिसून येत आहे. मात्र या गरीब फेरीविक्रेते टपरी व्यावसायिक यांचा विचार केला गेला नाही, आम्हाला व्यवसाय करण्यास पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी अनेक फेरीविक्रेते, व्यावसायिक करीत आहेत.

दखल न्यूज भारत