मंदिरात पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का ? : तृप्ती देसाई यांचा सवाल

0
153

 

पुणे : महाराष्ट्राताच नाही तर संपूर्ण देशात अनेक मंदिरातले पुजारी अर्धनग्न असतात मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत?” असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला विचारला आहे.

शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून येऊ नये असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं. या आशयाचे फलकही साई मंदिर परिसरात लावण्यात आले. याबाबत आता तृप्ती देसाई यांनी प्रश्न विचारला आहे.

शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

साई संस्थानाने केलेल्या या आवाहनावर बोलताना तृप्ती देसाई यांनी म्हटलं की, “मंदिरात प्रवेश करताना कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजेत त्याचं भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवता येत नाही. श्रद्धा महत्त्वाची असते.” असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे,दुसरीकडे या विषयावर गदारोळ उठला असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाई यांच्यावर टीका केली आहे.