पदवीधर निवडणुकीसाठी माहूर प्रशासन सज्ज.

 

 

माहूर प्रतिनिधी// पवन कोंडे

 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणुक मंगळवार दि.1 डिसेंबर 2020 रोजी पार पडणार असून माहूर तालुक्यात एकूण 4 मतदान केंद्र व 905 पदवीधर मतदार आहेत.मतदान प्रक्रीया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 121 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी दि.30 नोव्हें.रोजी पत्रकारांना दिली.
माहूर 472,वानोळा 80,वाई बाजार 204 व सिंदखेड 149 असे एकूण 905 मतदार आहेत. मतदान प्रक्रीया स.8 ते सायं.5 वाजे पर्यंत चालणार असून प्रत्येक मतदान केंद्रात 1 केंद्राधिक्षक व 3 कर्मचारी कार्यरत असणार आहेत.1पुरुष व 1 महीला पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. वाई व सिंदखेड मतदान केंद्रासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान तर माहूर व वानोळा केंद्रा करीता सा.बांध.विभागाचे उपअभियंता वसंत झरीकर हे क्षेत्रीय अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडणार आहेत.
हे मतदान ई.व्ही.एम. मशीन ऐवजी मत पत्रिकेद्वारे पार पडणार असून मतदारांनी मतदान करतांना निवडणुक आयोगाने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच क्रमांक टाकणे अनिवार्य आहे.टाकलेला क्रमांक आकड्यांतच असावा अक्षरी नसावा तसेच मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर 1 क्रमांक टाकणे अत्यावश्यक आहे. एकापेक्षा अधिक क्रमांक टाकू नये,तसे केल्यास ते मतदान ग्राह्य धरल्या जाणार नाही.या शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग केली जाणार असून सॅनिटायझरचा वापर करण्यात येणार आहे.दोन मतदारांत 6 फुटांचे अंतर राखणे बंधनकारक आहे.मास्क लावल्या शिवाय मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान करण्यासाठी महीला,पुरुष व जेष्ठनागरिकान बरोबर दिव्यांगासाठी वेगवेगळ्या तिन रांगा लावण्यात येणार असल्याचे तहसीलदार वरणगांवकरांनी सांगितले.
मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 4 पोलीस अधिकारी व 24 कर्मचारी तैनात केले जाणार असल्याची माहिती उपविभागिय अधिकारी विलास जाधव यांनी दिली.