वडसा देसाईगंज येथील दुचाकी चोरून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी झोडपले

 

हर्ष साखरे सहा जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- देसाईगंज शहरात घरफोड्या, अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाच मुख्य बाजारपेठेत दुचाकी पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलेच बदडले. दरम्यान घटनास्थळी वेळेवर पोलिस पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरात स्प्लेंडर मोटारसायकल उभी करून एक ग्राहक भाजीपाला घेत असता ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेर/नवरगाव येथील राहुल रामदास ठेंगरे 30, वर्षे हा इसम सदर मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आला. काही नागरिकांना संशय आला असता चौकशी अंती सदर इसम मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांनी सदर इसमास चांगलेच धुतले.

दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेऊन बोलते केले असता मोटारसायकल पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर इसमावर भांदविचे कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास देसाईगंज पोलीस स्टेशन करत आहे.