यवतमाळ कोरोना अपडेट, तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 22 जण नव्याने पॉझेटिव्ह  ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 22 जणांना डिस्चार्ज

0
282

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

जिल्ह्यात आज दि.20 जुलैला सोमवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने एकूण मृत्युंची संख्या 20 झाली आहे. तसेच जिल्ह्यात 22 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 22 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात तीन मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील तारपुरा येथील 55 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील 39 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा शहरातील मशीद वॉर्ड येथील 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 22 जणांमध्ये 10 पुरुष आणि 12 महिला आहे. यात यवतमाळ शहरातील साई नगर येथील एक पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, शास्त्री नगर येथील एक पुरुष आणि दिग्रस येथील एक पुरुष, कळंब तालुक्यातील जोडमोह येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील चोंडी येथील एक महिला, पुसद शहरातील राम नगर येथील तीन पुरुष व चार महिला, पुसद शहरातील गणेश वॉर्ड येथील एक महिला, उमरखेड येथील तीन महिला, दारव्हा तालुक्यातील मानकोपरा येथील एक पुरुष, वणी शहरातील एक महिला व एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात रविवारपर्यंत 159 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. आज (दि. 20) रोजी नव्याने 22 पॉझेटिव्ह आले व बरे झालेल्या 22 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने हा आकडा 159 वर स्थिरावला. मात्र तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात 156 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 93 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 63 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 580 झाली आहे. यापैकी 404 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 20 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 101 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 9728 नमुने पाठविले असून यापैकी 9466 प्राप्त तर 262 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8886 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.