लाॅकडाउन हा अंतिम पर्याय नाही: आयुक्त तुकाराम मुंढे शहरातील नागरिकांचा संभ्रम झाला दूर.

0
71

 

आशिष भगवान थूल (९८३४७१८२६८)
प्रतिनिधी 
दखल न्यूज भारत नागपुर

नागपूर :- दि.१८जुलै २०२०
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक बाबतीत प्रशासनाने शिथिलता दिली होती. त्यात लाॅकडाउन शिथिल झाल्यानंतर नागपुरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी निर्बंध न पाळल्यास पुन्हा लाॅकडाउन लावावे लागेल, असा इशारा नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी लॉकडाउन हाच अंतिम पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत तूर्त लाॅकडाउन लागणार नाही, असे संकेत दिले. त्यामुळे शहरातील संभ्रमात असलेल्या नागरिकांचा संभ्रम दूर झाला.
लाॅकडाउन मध्ये शिथिलता दिल्यानंतर नागपूर शहरात मागील काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच दररोज प्रतिबंधित क्षेत्रातही भर पडत आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागावे, नियम व शर्तींचे पालन करावे. लाॅकडाउन लावणे तुमच्या हातात आहे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनीही शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांना केले.
राज्यातील मोठ्या शहरात पुन्हा लाॅकडाउन लावण्यात आले आहे. त्यात नागपूर शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरात पुन्हा लाॅकडाउन लावले जाईल अशा स्वरूपाच्या चर्चेला पेव फुटले होते. परंतु शहरातील नागरिक बाजारात, सार्वजनिक ठिकाणी, ‘फिजिकल डिस्टन्स’ व निर्बंधांचे पालन करत नसल्याचे चित्र असल्याने पुन्हा लाॅकडाउन लागेल अशी चर्चा सुरू झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
परंतु लाॅकडाउन लावायचे झाले तरी प्रशासनाला या संदर्भात आवश्यक ती तयारी करावी लागेल. पोलीस व अन्य विभागाची यंत्रणा सज्ज ठेवावी लागेल. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते सर्वांच्या हिताचे आहे.लाॅकडाउन हाच अंतिम पर्याय नाही, त्यामुळे सध्यातरी, मी नागपूर शहरात टाळेबंदी करणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले.