वणी: परशुराम पोटे
वणीमध्ये कोविड-19 ने बाधित 20 व्यक्तींची ओळख पटल्यानंतर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वणी शहरात दुसऱ्यांदा सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार दि.19 जुलै पासून आरोग्य सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे.
वणी शहरातील 13 प्रभागमध्ये हे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. यासाठी प्रशासनातर्फे दि. 19 जुलैला येथील कल्याण मंडपम मध्ये 125 शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण उपविभागीय अधिकार डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कमलाकर पोहे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिले.
या आरोग्य सर्वेक्षणासाठी नगर परिषद व जिल्हा परिषद शिक्षकांना घेण्यात आले आहे. शहरातील 13 प्रभागातील प्रत्येक प्रभागात 8 शिक्षकांचे 4 पथक तयार करण्यात आले असून या प्रत्येक पथकात 2 शिक्षकांचा समावेश आहे.
या आरोग्य सर्वेक्षणासाठी प्रत्येक पथकाकडे ऑक्सिमीटर व थर्मलस्कॅनर देण्यात आले असून या मशिनद्वारे प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जात आहे. या शिवाय ज्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, रक्तदाब असल्यास किंवा जी व्यक्ती मागील दोन महिन्यात बाहेर गावाहून आली आहे, त्यांची खरी माहिती घरी आलेल्या प्रगणकांना देऊन कोरोनाशी लढा देण्यात प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले आहे.