१५ जुलैपासून मंगरूळपीर, रिसोडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन तर इतर चार शहरांमध्ये ८ ते २ वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम, दि. १३ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप, बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वा. पर्यंत केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. वाशिम, मालेगाव, कारंजा लाड आणि मानोरा या शहरांमध्ये सुद्धा लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू येणार आहे. या चारही शहरांमधील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना सुरु ठेवण्याचा कालावधी १५ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व आस्थापना, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी लोकांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मंगरूळपीर आणि रिसोड या दोन शहरांमध्ये १५ जुलै ते २१ जुलै २०२० (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून संचारबंदीचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

संपूर्ण लॉकडाऊन काळात दवाखाने, मेडिकल स्टोअर २४ तास सुरु राहतील. तसेच दुध व भाजीपाला विक्री सकाळी ७ ते १० वाजेपर्यंतच सुरु राहील. याशिवाय इतर सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप बंद राहतील. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहील. घरगुती गॅस व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा घरपोच करण्यास मुभा राहील. याकरिता कोणत्याही पासेसची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले.

लॉकडाऊन काळात मंगरूळपीर व रिसोड शहरातील सर्व बँक शाखा बंद राहणार आहेत. या काळात नागरिकांना राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपये पर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी अकोला डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयातील ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व आवश्यक असलेल्या रक्कमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जावून रक्कम अदा करण्याची कार्यवाही करेल. सकाळी ७ ते १० वा. पर्यंतच्या काळात एटीएममधून पैसे काढण्यास मुभा राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चार शहरांमध्ये दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत बदल

वाशिम, मालेगाव, कारंजा लाड व मानोरा या शहरी भागात सुद्धा कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्यात आला असून यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप, घरोघरी जावून गॅस पुरवठा व बँका १५ जुलै ते ३१ जुलै २०२० दरम्यान (दोन्ही दिवस धरून) सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरु राहतील. केवळ दवाखाने, मेडिकल स्टोअर २४ तास सुरु राहतील. नवीन नियमावली लागू केल्यानंतरही या चार शहरांमधील अनावश्यक गर्दी कमी न झाल्यास अथवा डिस्टसिंगच्या नियमांचे पालन न झाल्यास या शहरांमध्ये सुद्धा टप्प्या-टप्प्याने संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत विचार केला जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले. सर्व सहाही शहरात वृत्तपत्र घरपोच वितरणास मुभा राहील.

लग्न समारंभ, अंत्यविधीला २० लोकांच्या उपस्थितीला मुभा

‘लॉकडाऊन’च्या नवीन नियमानुसार जिल्ह्यात सर्वच ठिकाणी लग्न समारंभ व अंत्यविधीला यापुढे केवळ २० लोकांच्या उपस्थितीला मुभा राहील. या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र, सदर ठिकाणी २० पेक्षा जास्त लोक एकत्रित जमल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.