गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआयसह कान्स्टेंबल अडकले एसीबीच्या जाळ्यात

212

 

बिंबिसार शहारे/अतीत डोंगरे

गोंदिया,दि.18/07/2020:
अवैध दारूविक्रीचा गुन्हा दाखल न करण्याच्या नावाखाली तसेच पुढे व्यवसाय सुरू ठेवण्याकरीता हप्त्याच्या नावाखाली लाच मागणारे गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षकासह एक पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई (दि.१८) दुपारदरम्यान गोंदिया लाचलुचपत विभागाने केली. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मुकूंद पवार, पोलिस कर्मचारी शरद प्रकाश चव्हाण असे लाचखोर आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी हा हॉटेल व्यवसायिक आहे. २ जुलै रोजी फिर्यादी हजर नसताना हॉटेलमध्ये सपोनि पवार हे पोलिस पथकासह
दाखल झाले. दरम्यान दुकानात कसलीही दारू मिळाली नाही. मात्र, दुकानाच्या परिसरात दारूचे काही रिकाम्या बाटल दिसून आल्या. यावरुन अवैध दारू विक्री करीत असल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.
दरम्यान गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस कर्मचारी चव्हाण यांनी तक्रारकत्र्याला १५ हजार रूपयाची मागणी केली. तसेच पुढील व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी १० हजार रूपये मासिक हप्त्याची मागणी केली. तर तक्रारदाराने नाईलाजास्तव शरद चव्हाण याला ८ हजार रूपये दिले. उर्वरित २ हजार रूपये आणि मासिक हप्त्याचे १० हजार रूपये एकूण १२ हजार रूपयाची मागणीचा तगादा लावला. तक्रारकर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने या बाबीची तक्रार गोंदिया लाचलुचपत विभागाकडे केली. लाचलुचपत विभागाने तक्रारीची शहनिशा केली असता सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पवार व पोलिस कर्मचारी शरद चव्हाण हे दोघे लाच पंचासमक्ष लाच मागत असल्याची बाब स्पष्ट झाली. तसेच (दि.१८) चालु महिन्याची ४ हजार रूपये लाच पंचासमक्ष मागणी करून लाचरक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. यावरून लाचलुचपत विभागाने सपोनि प्रशांत पवार व पोलिस कर्मचारी शरद चव्हाण या दोघांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. ही कारवाई पोलिस अधिक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस अधिक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, सफौ शिवशंकर तुमडे, विजय खोब्रागडे, प्रदिप तुळसकर, राजेश शेंदरे, रंजित बिसेन, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन यांनी ही कारवाई केली.