राज्यातील या दोन जिल्ह्यांत ४ ऑगस्टपासून वाजणार शाळेची बेल, शैक्षणिक सत्र सुरू करण्याची तयारी?

0
609

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देश आणि राज्यासमोर सध्या गंभीर आव्हान उभे राहिलेले आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसायांसोबतच शिक्षणक्षेत्रालाही फटका बसला असून, मार्च महिन्यापासूनच शाळा बंद आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाचा फैलाव कमी असलेल्या भागात शाळा सुरू करण्याबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर आणि गडचिरोली भागात शाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली असुन या जिल्ह्यांमध्ये ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांत देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दहा लाखांच्या तर राज्यातील बाधितांची संख्या तीन लाखांच्या वर गेली आहे. मात्र असले तरी राज्यात कोरोनाचा संसर्ग हा मुख्यत्वेकरून मोठी शहरे आणि आसपासच्या भागात आहे. तर ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा फैलाव तितकासा झालेला नाही. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक या पट्ट्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असला तरी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आदी भागात कोरोनाचा फैलाव मर्यादित राहिला आहे.

त्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण खात्याकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. तसेच त्यासाठी या दोन्ही जिल्ह्यामधील शाळा सॅनिटाइझ करून घेण्याची सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला केली आहे. त्यामुळे आता याबाबत पुढच्या काळात कोणता अंतिम निर्णय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.