राज्यातील शाळेमध्ये किलबिल सुरु होण्याच्या आशा झाल्या पल्लवित. राज्यातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार

170

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

गडचिरोलीसह राज्यातील सर्व शाळा 4 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली, त्यात त्यांनी ही माहिती दिली. सध्याची स्थिती बघता 4 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क,सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात,असे निर्देशही त्यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क दाव्यांचा एक महिन्यात निपटारा करावा. वनहक्क दाव्यांच्या मंजुरीबाबत प्रादेशिक स्तरावर मंजुरीचे आदेश असावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.तसेच ५ हेक्टपर्यंतचे अधिकार उपवनसंरक्षकांकडे ठेवण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासनाचे परिश्रम व जनतेच्या सहकार्याने जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. जिल्हयातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी पुन्हा ५ कोटी निधी येत्या आठ दिवसांत जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.