कोरची ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी आठ महिन्यापासून वेतनाच्या प्रतिक्षेत.. वरिष्ठांकडून दुर्लक्ष; त्वरीत वेतन अदा करण्याची भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष आशिष अग्रवाल यांची मागणी…

117

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

कोरची : सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातला असून आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वरक्षणासाठी नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु काही असे कोरोना योद्धा आहेत जे कोरोनाच्या विरोधात सुरुवातीपासून लढा देत आहेत. ज्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे योगदान खूप मोठे आहे. ग्रामीण रुग्णालय कोरची येथे तीन कंत्राटी कर्मचारी मागील कित्येक वर्षांपासून निरंतर सेवा देत असून मागील आठ महिन्यांपेक्षा जास्त झाले असून सुद्धा अजून पर्यंत त्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. त्यांना कुठलाही जोडधंदा नसल्याकारणाने या कोरोना योद्धाना आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या कोरची येथे एकही लिपिक कार्यरत नसून कार्यालयीन कामकाज हे रामभरोसे सुरू आहे. ग्रामीण रुग्णालय कोरची येथील वैद्यकीय अधीक्षक यांचा चार्ज डॉ. धुर्वे यांना देण्यात आला असून ते गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत आहेत.

ग्रामीण रुग्णालय कोरची येथील कनिष्ठ लिपिक रवींद्र वाढई यांची काही दिवसापूर्वी कोरची येथून प्रतिनियुक्ती करण्यात आली असून सुद्धा वाढई हे नेहमी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दिसतात. कार्यालयीन कामाबद्दल विचारणा केली असता माझ्याकडे आता कुठले चार्ज नसल्याचे रवींद्र वाढई सांगतात. काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी रुग्ण कल्याण समिती मध्ये चौकशीचे आदेश दिले असल्यामुळे तर वाढई इथे भटकत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. मागील दहा दिवसापासून 102 क्रमांकाची रुग्णवाहिका बंद अवस्थेत असून दुरुस्तीसाठी देण्यात आलेली आहे. त्या रुग्णवाहिकेच्या जागेवर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली नसून तालुक्यात मलेरीयाचा थैमान वाढत असल्यामुळे रुग्णवाहिका लवकरात लवकर कोरची येथे देण्यात यावी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देण्यात यावे अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाअध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी केली आहे.