दापोलीत ३५ विदेशी संदेशवहन कबुतरे दाखल, निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त मोबाईल/ इंटरनेट सेवेला पर्याय म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम.

304

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

दापोली : जूनमध्ये झालेल्या वादळात दापोली, मंडणगड तालुक्यातील किनारी भागातील मोबाईल, इंटरनेट सेवा उध्वस्त झाल्या. यामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या पुढाकाराने युक्रेन- रशियामधून ३५ संदेशवहन कबुतरे दापोलीत आणण्यात आली आहेत, सोबत त्यांना वापरण्यात तरबेज ३ रशियन नागरिकही आहेत. यांची किंमत प्रत्येकी ३.५ लाख रुपये असून ती सामान्य कबुतरांच्या तिप्पट वजनाची म्हणजेच साधारणपणे कोकणी घारीच्या आकाराची आहेत. यांचा रंग फिकट पांढरा असून ती अत्यंत देखणी आणि रुबाबदार आहेत. रशियामध्ये गेली २००० वर्षे या पक्षांचा संदेशवहनासाठी वापर केला जात आहे. प्रति तास ३०-३५ किमीच्या वेगाने उडणारे हे पक्षी एका उड्डाणात ५० किमीचे अंतर विनाथांबा जाऊ शकतात आणि सोबत १ किलोपर्यंत वजन नेऊ शकतात. यांच्या आगमनाची बातमी कळल्यावर किसान भवन दापोली येथील मंत्री उदय सामंत यांच्या तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या वादळ मदत कक्षात युक्रेनी कबुतरे बघण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.  प्रशासनाचे नागरिकांना आवाहन केले आहे की सदर कबुरतांना जीपीएस कॉलर बसवलेली असल्याने अशा कबुतरांना पकडण्याचा अथवा त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अशाप्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याने रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या कल्पकतेचे नागरिकांकडून खूप कौतुक होत आहे. ( साभार- टाइम्स ऑफ इंडिया- मुंबई आवृत्ती, १७ जुलै २०२०)

दखल न्यूज भारत