Home Breaking News मगरडोह परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस विभागातर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न

मगरडोह परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस विभागातर्फे मार्गदर्शन मेळावा संपन्न

172

 

बिंबिसार शहारे(९५४५७७६३७८)
वि.जिल्हा प्रतिनिधी दखल न्युज

देवरी दि.17/07/2020:
चिचगड पोलीस प्रशासनाच्या वतीने सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह हद्दीतील लाभार्थी नागरिकांना रेशन कार्ड तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात मेळावा आयोजित करुन लाभार्थ्यांना विविध कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना यावेळी मार्गदर्शन करुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियाना राबविताना पेट्रोलिंग दरम्यान नागरिकांच्या अडचणी जाणून घेत निराकरण करण्यासाठी सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नियमित ग्रामभेट घेतल्या गेल्या. कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात घेण्यात आलेल्या ग्रामभेटीदरम्यान ग्रामस्थांनी अन्नधान्य पुरवठ्याबाबत अडचणी सांगितल्या. प्रशासनाकडून रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य पुरवठा केला जातो. परंतु काही नागरिकांकडे इतर कारणांमुळे रेशन कार्ड नसल्याचे कळले तर विभक्त कुटुंबामुळे काही जणांचे रेशन कार्डात नाव नाही यामुळे मोफत रेशन मिळण्यास अडचणी येत असल्याची समस्या समोर आल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाशी संपर्क साधत सदर अडचणी सोडविण्यावर चर्चा केली. तसेच त्याकरीता चिचगड पोलीस ठाणे प्रभारी अतुल तवाडे यांच्या उपस्थितीत सदर मेळाव्याचे आयोजन करुन महसूल प्रशासनाकडून अपर तहसीलदार उईके व त्यांच्या चमूने सहभाग घेत लाभार्थींना शासकीय योजनांची माहिती देऊन एकल खिडकीखाली रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना मिळवून देण्याचे काम करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते राजीक खान, मगरडोह प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, परि. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे, गणेश गिरी व मगरडोह पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

Previous articleMuhammad – The Messenger of the God चित्रपटावर बंदीसाठी मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Next articleवडसा येथील 4 SRPF जवान कोरोनामुक्त