घाटकोपर मध्ये अज्ञात चोरांनी दुकाने फोडली

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी भुरटे चोर संधी साधून हातसफाई करत आहे. बुधवारी पहाटे घाटकोपर पूर्व येथील पाच दुकाने अज्ञात चोरांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान पंतनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरां विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पूर्वेच्या स्टेशन रोड समोरील निर्धार सोसायटी येथील प्रगती कंट्रक्शन आणि प्रगती फरसान मार्ट तसेच इगल हौसिंग सोसायटी मधील बाबूभाई फरसाण व डॉ गौतम वर्मा यांचे स्किन अँड हेअर क्लिनिक हे दुकान तसेच शेजारील बडीस बर्गर हे पाच दुकाने पहाटेच्या सुमारास सराईत चोरांनी दुकाने फोडून आत मधील साहित्याची चोरी व अंदाजे 10 हजार रोख रक्कम लंपास केला. या प्रकरणी अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहेत. दरम्यान येथील स्थानिक नागरिक नंदकुमार टिपू यांनी या घटने बाबत सांगितले की लॉकडाऊनच्या काळात एकाच दिवसात पाच दुकाने फोडल्याने परिसरात दहशत वाढली असून येथे गर्दुल्यांचा वावर देखील वाढला असल्याने पोलिसांनी येथे गस्त वाढवावी अशी मागणी टिपू यांनी केली आहे.