राजुरच्या राघोजी ब्रिगेडचा अनोखा शिक्षक दिन सामाजिक बांधिलकी जपत गरजु कुटुंबाला मदत

0
209

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

राजुर (अकोले) दि. ७ : राघोजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी अकोले तालुक्यातील रनद (रंधा) खुर्द येथे एक आगळावेगळा शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे कुटुंबावर संकट ओढवले होते. दु:खातुन सावरण्यासाठी आधाराची गरज होती. त्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप तसेच तेथील शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना शालेय पुस्तके, वह्या, पेन, चॉकलेट आदी वस्तूंचे वाटप संघटनेच्या वतीने करण्यात आले.

अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या अकोले तालुक्यातील रनद (रंधा) खुर्द येथील कातकरी समाजातील पिंटु पवार यांच्या कुटुंबीयांची ही कहाणी आहे. ३५ वर्षीय त्यांचे बंधु किसन पवार मासे पकडण्याचे जाळे आणण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे गेले होते. अति मद्य प्राशन केल्यामुळे तिकडेच त्यांचे निधन झाले. ओळख न पटल्यामुळे घोटी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. शोधाशोध सुरु केल्यावर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा फोटो बघायला मिळाला. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

मयत किसनचे भाऊ पिंटु सखाराम पवार यांनी सांगितले की, भावाच्या व माझ्या अशा १३ जणांच्या कुटुंबासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. खेकडी व मासे विकुन कसेतरी पोट भरत आहे. कसायला जमीन नाही. केवळ राहायला घर आहे. आमची काही अपेक्षा नाही फक्त आम्हाला रेशनकार्ड मिळवुन द्या बस्स.. अशी त्यांची मागणी आहे. एकीकडे कर्जाला कंटाळून मरणाला जवळ करणारे शेतकरी व दुसरीकडे रोजच मरणयातना भोगणारे आदिवासी कातकरी पवार कुटुंब. जगण्याची उमेद मात्र त्यांनी सोडली नाही. पवार कुटुंबात एकूण ९ मुले आहेत. परिस्थितीला कंटाळून प्रकाशने आठवीतूनच शाळेला रामराम ठोकला. विलास दहावीत असून इंजिनिअर होण्याची इच्छा आहे. रेणूका व विनोद यांना शिक्षक व्हायचे आहे. कैलासचा पोलीस होण्याचा मानस आहे. गणेश, मनिषा व विकास अजुन लहान आहेत.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘राघोजी ब्रिगेड’ संघटनेने हा खुपच सुंदर उपक्रम राबवला आहे. केवळ मदत करुन ते थांबले नाहीत तर पवार कुटुंबाच्या सतत संपर्कात राहून त्यांना सर्वोतोपरी मदत करत आहेत. सामाजिक बांधिलकी प्रत्येकाने जपली पाहिजे. समाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकाने आपले नैतिक कर्तव्य समजुन हातभार लावावा असे आवाहन राघोजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दिपक देशमुख यांनी केले. याप्रसंगी विशेष शिक्षक प्रशांत देशमुख, पी. एस. आय. संतोष देशमुख, विजय वेडे, सुनिल बांबेरे, प्रकाश धिंदळे, सोपान देशमुख, अशोक वेडे, चंदु कोकतरे, महेश येलमामे, महेश कोकतरे, समीर देशमुख, अक्षय शिंदे हे उपस्थित होते. आनंद देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.