Home Maharashtra आयपीएल आणि राज्यस्तरीय महिला खेळाडूंचा होणार गौरव…. — भारत अगेन्स्ट करप्शनचे...

आयपीएल आणि राज्यस्तरीय महिला खेळाडूंचा होणार गौरव…. — भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन….

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका 

   पुणे :- क्रिकेटच्या मैदानात आपल्या अष्टपैलू कामगिरीने महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या जाज्वल्य महिला क्रिकेटपटूंचा सन्मानार्थ पुण्यात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी, दिनांक २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता,पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ सोहळा संपन्न होईल.या सोहळ्याला माजी रणजी क्रिकेटपटू हेमंत किणीकर आणि राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू कुमारी अनुजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.महिला क्रिकेटपटूंच्या कार्यकर्तुत्वाचा सन्मान तसेच त्यांना भविष्यातील यशाकरीत प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील म्हणाले.

      यावर्षीचा प्रतिष्ठित ‘क्रिकेट रत्न पुरस्कार’ महिला क्रिकेट विश्वात आपली ओळख निर्माण करणाऱ्या, डब्ल्यूपीएल (WPL) आणि आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळीने आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पुनम खेमनार,स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच मैदानात उत्तुंग षटकार ठोकत महिला क्रिकेटमध्ये एक वेगळी आणि आक्रमक ओळख निर्माण करणाऱ्या आयपीएल खेळाडू किरण नवगिरे यांना प्रदान केला जाईल.

        उत्कृष्ट गोलंदाजी आणि कठीण प्रसंगात संघाला सावरणाऱ्या फलंदाजीच्या जोरावर आयपीएलच्या मंचावर स्वतःला सिद्ध करणाऱ्या गौतमी नाईक, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघाला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून देणाऱ्या भक्ती मिरजकर, उत्कृष्ट तंत्र आणि अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर अत्यंत कमी वयात क्रिकेट वर्तुळात आपली छाप सोडणाऱ्या अक्षया जाधव यांचा देखील गौरव केला जाईल.

       महिला क्रिकेटपटूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल पातळीवर मिळवलेले यश हे थक्क करणारे आहे.या रणरागिणींचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. महिला क्रिकेटपटूंना क्रिडाक्षेत्रातील यशासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. हा सोहळा सर्व क्रीडाप्रेमींसाठी खुला असून, पुण्याच्या क्रीडा वर्तुळातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका कुंभार करतील.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.