दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील दानपेटीतील रक्कम अपहार केल्याप्रकरणी मंदिरातील सेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशाल बाळ वारुळे (वय ३३) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर महादेव वीर (वय ४९), व्यवस्थापक, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल वारुळे हा ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे सेवक म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर दानपेटीतील पैसे काढून कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
दरम्यान, दिनांक १२ मे, १३ मे आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान आरोपीने दानपेटीतील रक्कम काढताना नजर चुकवून पैसे पोत्यामध्ये भरल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोते बादलीमध्ये ठेवून त्यावर ट्रे ठेवण्यात येत असे. कॅशियर रूममध्ये नेल्यानंतर कपाटामागे पैसे लपवून त्यावर फुलांचे हार ठेवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच, कॅशियर महेश गोपाळ गोखले यांना “हार घेऊन जात आहे” असा भास निर्माण करून आरोपीने तीन दिवसांत प्रत्येकी सुमारे पाच हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्याद मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडके करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



