शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- सिरसपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी माजी विद्यार्थी व पालक उद्धबोधन शिबीर संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वनिता दडमल यांनी केले.
अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुनील डोये होते.प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. दिनकर चौधरी,राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी,साहित्यिक सुरेश डांगे,सामाजिक कार्यकर्ते हरी मेश्राम उपस्थित होते.
माजी विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांचे समन्वयातून शाळेचा,गावाचा चेहरामोहरा बदलता येऊ शकते.विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास होण्यासाठी वरील तीन घटकांनी एकत्र येऊन काम केल्यास निश्चितच परिणाम जाणवतात.
विद्यार्थी आणि पालक मैत्री ही काळाची गरज आहे या उद्देश्यातून या शिबिराचे आयोजन मुख्याध्यापक बंडू नन्नावरे यांचे नेतृत्वात करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.डॉ.दिनकर चौधरी यांनी पालकांनी,नागरिकांनी सजग राहून आपल्या पाल्याचा शैक्षणिक उत्कर्ष कसा होईल याची दक्षता घ्यावी असा सल्ला पालकांना दिला.
शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले हरी मेश्राम यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती,नवोदय,सैनिकी शाळा आणि इतर स्पर्धा परीक्षा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांनी दक्ष असणे गरजेचे असल्याचे त्यांनी निक्षुण सांगितले.
मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी समाज,पालक,नागरिक यांनी शाळेला आपलं समजावं आणि विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
सुरेश डांगे यांनी शासनाचा शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोण अतिशय नकारात्मक असून शिक्षण आणि शाळा संकटात आहेत.सरकारचं शाळा बंद करण्याचं धोरण आहे.शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्यायचं नाही यासाठी शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामांचा भडीमार लावला आहे.अशाही परिस्थितीत शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन केले.
विद्यार्थी व पालक उद्बोधन शिबिरात गावातील युवती मनीषा दडमल हिची अलिकडेच अभियांत्रिकी सेवेत निवड झाल्याबद्दल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन,प्रास्ताविक मुख्याध्यापक बंडू नन्नावरे यांनी केले तर आभार मंगला सावरकर यांनी मानले.
शिबिराला आजी माजी विद्यार्थी,पालक,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी संघ,ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.



