बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
लाखेवाडी तालुका इंदापूर येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, येथे इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील सुमारे ६० शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त एकूण २१० विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या १० विद्यार्थिनींनी पीक विज्ञान विषयात २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच बारावी बोर्ड परीक्षेत इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणारी पल्लीपरमबील हीबा अब्दुल हमीद हिचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गणेश पवार यांनी केले. संस्थेच्या विश्वस्त रिलायन्स जिओ इंजिनिअर अक्षता ढोले-पाखरे यांनी विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले.
संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, गटनेते तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांनी विद्यार्थ्यांना “यशस्वी भव!” असा आशीर्वाद देत ध्येय निश्चित करून समाजसेवेची प्रेरणा दिली. तसेच संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती व सुविधांची माहिती दिली.
उपाध्यक्षा डॉ. चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक मानसिकता, गुणवत्ता व योग्य करिअर निवडीचे महत्त्व पटवून दिले. इंटरनेट व मोबाईलचा विधायक वापर करण्याचा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल संस्थेचे व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
या गुणगौरव समारंभास जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष, गटनेते तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा डॉ.चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिव पौर्णिमा खाडे, विश्वस्त पृथ्वीराज ढोले,ह्रुषिकेश ढोले, सौ.अक्षता ढोले-पाखरे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.सम्राट खेडकर, यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



