तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वोत्तम भुमी पुत्र :- आ.ह.साळुंके…

 

       भारतीय इतिहासातील लोकशाही,स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्रोत म्हणजे गौतम बुद्ध,या शब्दांत थोर विचारवंत शरद पाटील यांनी बुद्धाची महती वर्णिली आहे, तर दुसरे एक प्रख्यात विचारवंत आ. ह. साळुंके यांनी बुद्धाला सर्वोत्तम भूमिपुत्र संबोधले आहे.

     तथागत गौतम बुद्धाच्या जीवनात वैशाखी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या; त्या म्हणजे १. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म, २. राजकन्या यशोधरेचा जन्म, ३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह), ४. ज्ञानप्राप्ती, ५. महापरिनिर्वाण

     वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत ‘वेसाक्को’ म्हणतात. वर उल्लेखिलेल्या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. राजा शुद्धोधनाच्या कुटुंबात अनेक वर्षांपासून अपत्यजन्माची घटना घडलेली नव्हती. या बालकाच्या आगमनाने सर्व अर्थ सिद्ध झाले म्हणून बाळाला ‘सिद्धार्थ’ हे नाव देण्यात आले. अखिल मानवजातीचे, पशू-पक्ष्यांचे, कीटक-पतंगाचे आणि सर्व चराचरांचा कल्याण करणारा भगवान तथागत, सम्यक सम्बुद्ध, महाकरुणिक, महानुकंपाय, अरिहंत जन्माला आल्याच्या या दिवशी ‘बुद्ध जयंती’ साजरी केली जाते. कपिलवस्तू व देवदह यांच्यामधल्या नेपाळ तराईच्या अरण्यामध्ये लुम्बिनी नामक अतिशय सुंदर वनात उगवत्या सूर्याच्या साक्षीने तथागत जन्माला आले.

       ज्या क्षणाला लुम्बिनी वनात राजकुमार सिद्धार्थ जन्माला आले, त्याच क्षणी अन्य काही जणांचाही जन्म जम्बु द्विपात झाला.कपिलवस्तूनगरीच्या शेजारील रामनगर राज्यात कोलीय राजा दंडपाणीच्या राजमहालात एका देखण्या कन्येने जन्म घेतला. ही राजकन्या म्हणजे यशोधरा.सिद्धार्थ आणि यशोधरा हे समवयस्क होते.यशोधरा म्हणजे महान यश प्राप्त करणारी! गया येथील बोधिवृक्षाचा जन्मही याच दिवसाचा.

       हाच कालुदायी नामक राजा शुद्धोधनाच्या अमत्याचाही जन्मदिवस होय.तथागताचा सर्वांत प्रिय शिष्य म्हणून विश्वविख्यात झालेल्या आनंदचा जन्मही वैशाखी पौर्णिमेलाच झाला.याशिवाय सिद्धार्थ गौतमाचा सारथी छन्न,राजपुत्र सिद्धार्थचा प्रिय घोडा कन्थक,अजानीय गजराज हेदेखील याच दिवशी जन्माला आले.

       तत्कालीन परंपरेप्रमाणे राजा दंडपाणीने मुलीच्या लग्नासाठी स्वयंवर रचले होते. या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी सर्व देशांतल्या राजपुत्रांसमवेतच सिद्धार्थलाही आमंत्रित केले होते. प्रारंभी सिद्धार्थ या स्वयंवराला जाण्यास फारसा उत्सुक नव्हता. महाराणी प्रजापती गौतमीने समजूत घातल्यावर सिद्धार्थ तयार झाला. या स्वयंवरात सहभागी होऊन सिद्धार्थने अलौकिक कर्तृत्व गाजवले. स्वयंवरात एका रानटी घोड्याच्या पाठीवर स्वार होण्याची अट राजा दंडपाणीने घातली होती. हा घोडा अत्यंत हट्टी, रानटी व नाठाळ असल्याने कोणत्याही राजपुत्राला त्यास स्पर्श करण्याचे धैर्य झाले नाही. सिद्धार्थ मात्र या घोड्याच्या पाठीवर अगदी सहजपणे स्वार झाला. एवढेच नव्हे, तर त्याने त्याला सुतासारखा सरळही केला. यालाच अश्वलक्ष्यविद्या संबोधले जाते. 

           याबरोबरच लीपिज्ञान,बाणविद्या,धनुर्विद्या,काव्य, व्याकरण,पुराण,इतिहास,वेद,ज्योती,सांख्य,वैशेषिक,स्त्रीलक्षण इ. कला आणि विद्यांमध्ये सिद्धार्थने आपले नैपुण्य सर्वांसमक्ष सिद्ध केले.या स्वयंवर मंडपातच सिद्धार्थ आणि यशोधरा मंगलपरिणयात बद्ध झाले.

     सिद्धार्थ गौतम लुम्बिनीत जन्माला आला, तर भगवान बुद्धाचा जन्म बुद्धगयेत झाला, असे म्हंटले जाते. ही जागतिक महत्त्वाची पवित्र घटना होय. या आधीच्या तिन्ही घटनांना ऐतिहासिक महत्त्व आहे, यात शंका नाही. मात्र, ही चौथी घटना अखिल विश्वातल्या मानवजातीने अभिमान बाळगावा अशी आहे. फक्त मानवी समाजच नाही तर वन्यजीव, हिंस्त्र श्वापद, सूक्ष्म जीव, वनस्पती, सजीव-निर्जीव या साऱ्यांना मुक्तीच्या खरे म्हणजे कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या तथागतांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेला अनमोल असे महत्त्व आहे. गौतमला सम्यक संबोधी प्राप्त होऊन चार आर्यसत्यांचे व प्रतित्य समुत्पाद सिद्धान्ताचे ज्ञान झाले.वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी सिद्धार्थ सम्यक सम्बुद्ध झाले!

         वयाच्या ८० व्या वर्षी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी वैशाखी पौर्णिमा इ.स.पू. ४८३ मध्ये मल्ल देशातल्या कुशीनगर येथे शालवनात जोड्शाल वृक्षाखाली भगवन्ताना महानिर्वाणपद प्राप्त झाले. तथागतांनी अविश्रांतपणे ४५ वर्षे पवित्र धम्माचा प्रचार केला. बौद्ध धम्मात मुळातच असलेली उच्च कोटीची नीतितत्त्वे, सत्याचे स्वयंसिद्ध अधिष्ठान, उत्तम नैतिक शिक्षण आणि संपूर्ण सामाजिक गरजांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य या उपकारक गुणवैशिष्ट्यांमुळे बौद्ध धम्माचा अत्यंत तीव्र गतीने जगभरात प्रसार झाला.

       तथागतांच्या आयुष्यात वृक्षांचे खूप महत्त्व आहे.बालपणात कपिलवस्तूमध्ये जांभळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसण्याचा अभ्यास ते करीत. देहक्लेशासारखी कठोर तपस्या त्यांनी वटवृक्षाखाली केली. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती बोधिवृक्षाखाली. याशिवाय आम्रपालीने भिक्खू संघास ‘आमराई’ दान केली. राजा बिंबिसार यांनी तथागतांना ‘वेळूवन’ दान केले. त्याचप्रमाणे तथागतांचा जन्म व महापरिनिर्वाण दोन्ही प्रसंग शाल वृक्षाखालीच घडले. एकूणच बुद्धाच्या संपूर्ण आयुष्यात वैशाखी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्व विश्वाला कल्याणकारी ठरलेली आहे. म्हणूनच जगभरात वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून उत्साहात साजरी केली जाते.

     (लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेत कार्यरत आहेत.)

   — राजेंद्र रामटेके कुरखेडा तालुका ग्रामीण प्रतिनिधी यांनी प्रकाशित करण्यासाठी पाठविले आहे..