राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष नागपूर विभागाच्या दौऱ्यावर… — १९ जून पासून आढावा व जनसुनावणी घेणार… 

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली दि.१३ : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे १८ ते २४ जून २०२३ दरम्यान नागपूर विभागाच्या दौऱ्यावर येत आहेत. रविवार,१८ जून रोजी त्यांचे नागपुरात आगमन होणार आहे तर १९ जून पासून ते आढावा व जनसुनावणी घेणार आहेत.

        नागपूर येथे १९ जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निधी अंतर्गत मागील तीन वर्षात राबविलेल्या विविध योजना व त्यावरील खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच विभागातील सर्व जिल्हा परिषदा , महानगर पालिका यांच्याद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांचाही आढावा घेण्यात येणार आहे. महानगर पालिका आयुक्त आणि महाज्योती नागपूर यांच्यासोबत आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य विविध विषयांवर चर्चा करणार व योजनांचा आढावा घेणार आहेत.

        विभागीय आयुक्त कार्यालयात २० जून रोजी राज्य मागासवर्ग आयोगासमोर जनसुनावणी होणार आहे. यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर आणि भंडारा यांच्याशी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य चर्चा करतील. उभय जिल्ह्यांच्या सर्व जात प्रमाणपत्र निर्गमन अधिकारऱ्यांसोबत चर्चा व आढावा बैठकही होणार आहे. दिनांक २० जून रोजी सायंकाळी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य गोंदिया जिल्ह्याकडे प्रयाण करतील. २१ ते २४ जून पर्यंत आयोगाचा गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा आहे.