गरजू महिलांकरीता महिला सक्षमीकरण केंद्र कार्यान्वित… — सखी वन स्टॉप सेंटर…

ऋषी सहारे

संपादक

       गडचिरोली, दि. १०: केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून महिलांची सुरक्षा, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी “मिशन शक्ती” या एकछत्री योजनेतील “सामर्थ्य’ या उपयोजनेअंतर्गत “महिला सक्षमीकरण केंद्र” ही एक घटक योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार सदर केंद्र सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली येथे सुरु झाले असुन या योजनेचा लाभ गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.

          या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. सदर महिला सक्षमीकरण केंद्र जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटर, जुनी धर्मशाळा इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरुपात कार्यान्वित करण्यात आले आहे.

           या योजनेअंतर्गत जिल्हा तालुका व ग्रामपंचायत स्तरावर आलेल्या प्रवेशीत उच्च प्रतिचे शिक्षण व प्रशिक्षण, व्यावसायीक कारकीर्दे, व्यावसायीक समुपदेशन, वित्तीय नियोजन, उद्योजकता, बॅकवर्ड व फार्वड लिंकेजेस, कामगार वर्गाचे आरोग्य व सुरक्षितता आणि डिजीटल साक्षरता इत्यादी क्षेत्रात विविध संस्थात्मक स्तरावर योजनाबद्धरित्या सक्षम करण्यासाठी तसेच विकास करण्यासाठी महिला सक्षमीकरण केंद्राद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. तसेच शासकीय कार्यक्रमात नाव नोंदनी करण्यासाठी, महिलांना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी दारिद्रय रेषेखालील सर्वेक्षण, आधारकार्ड, मनरेगा नाव नोंदणी करणे यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करण्यात येते.

            केंद्रामध्ये येणाऱ्या प्रवेशित लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी सद्यास्थितीत वन स्टॉप सेंटर येथील केंद्र प्रशासक यांच्या समन्वयात कामकाज सुरु आहे. सर्व सामाजिक कार्येकर्ते, शासकीय, अशासकीय संस्थानी शासनाच्या या योजनेची माहिती जिल्ह्यातील तालुका व गावपातळीवर गरजू महिलांपर्यंत पोहचवावी असे आवाहन महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे. गरजु महिलांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या १८१ या महिला हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा अथवा प्रत्यक्ष भेट द्यावी असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर यांचे मार्गदर्शनात सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक श्रीमती संगीता वरगंटीवार यांनी केले आहे.