आरमोरी, वैरागड परिसरात युरिया खताचा तुटवडा…. — बांधावर खते तर सोडाच दुकानात सुद्धा युरीया मिळेना…. — बळीराजा झाला हवालदिल काय करावं कळेना……

प्रितम जनबंधु

संपादक 

           राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खत देणार होते, परंतु तसे झाले नाही. याउलट खते बांधावर येण्याऐवजी दुकानातही येत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसुन येत आहे. जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यात खतांच्या टंचाईचे चित्र दिसत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. आधीच पावसाअभावी मुबलक पाणी नसल्याने पेरणी लेट करावी लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. आता पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या खतांची टंचाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. तालुक्यात युरिया खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून खत विक्री करणाऱ्या दुकानांमधून युरिया गायब झाला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी युरिया मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. 

           गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सोय नसल्याने निसर्गावर अवलंबुन राहून शेती केली जाते. पावसाची अनिश्चितता असल्याने नेहमीच शेतकरी बांधवावर नैसर्गिक संकटे येत असतात त्यामुळे शेतीचे नुकसान होत असते व आर्थिक फटका बसत असतो. मात्र यंदाचा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असा पडत असल्याने शेतकरी आनंदी दिसुन येत आहे. मात्र युरीया खत मिळत नसल्याने त्याच्या आनंदावर विरजण पडले असल्याचे जाणवत आहे. पीक चांगले यावे म्हणून खताचा वापर केला जातो. परंतु काही दिवसांपासून मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा झालेला नाही. अतिशय कमी प्रमाणात खतपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

            भातशेतीसाठी जरी समाधानकारक पाऊस पडत असला, तरी शेतीसाठी लागणारे युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. कृषी सेवा केंद्रात खत मिळावे, याकरिता रांगा लागत आहेत. मात्र पुन्हा शेतकरी बांधवाना रिकामे हाती माघारी फिरावे लागत असल्याची अवस्था गडचीरोली जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. आरमोरी, वैरागड, कोरेगाव, वीहीरगाव, मानापुर, देलनवाडी, व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात युरिया खताचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसुन येत आहे.

          पावसाळ्यात शेतीच्या कामांसाठी लागणारे खत वेळेवर मिळत नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. आवश्यक त्या वेळी खताचा तुटवडा हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. असीच खताची अडचण भासत राहीली तर शेती करायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. सध्या पिकाची वाढ होण्यासाठी युरिया खताची गरज असल्याने शेतकरी खत कुठे मिळेल, याची शोधाशोध करत फिरत आहेत. मात्र शेतकऱ्याला वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती समोर येत आहे. त्यात आधीच शेतकरी अस्मानी संकटाने मेटाकुटीला आलेला असताना खत टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणावर खत केव्हा उपलब्ध होईल, अशा चिंतेत शेतकरी राजा सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने खताचा पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

             एकीकडे अनेक नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. अशातच शेतीसाठी लागणारे खत उपलब्ध नसल्याने भविष्यात अशाच अडचणी येत राहिल्या, तर शेती करायची की नाही असा यक्षप्रश्न उपस्थित होत असून शेतकरी हवालदिल होत आहे. खत मिळत नसल्याने सुपीक भातशेतीला अडचणी निर्माण होत आहेत. गडचिरोली जिल्हा मुख्यतः शेतीप्रधान जिल्हा आहे. येथील शेतकरी दरवर्षी भात उत्पादनातून उत्पन्न घेत असतो. म्हणुनच युरिया खताचा तुडवडा जाणवू नये, याकरिता कृषी विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेवुन युरियाचा मुबलक साठा शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी परीसरातील शेतकरी बांधवाकडुन होत आहे.