गरंडा जि.प.शाळेत साकारणार किल्ले रायगड प्रतिकृती,शिवराज्याभिषेक दिनाच्या पर्वावर भूमीपूजन संपन्न…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

पारशिवनी:- छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे एक अतूट नाते आहे. किंबहुना गडकिल्ल्यांशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. शिवचरित्राबरोबरच गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हवी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे किल्ले रायगडची प्रतिकृती साकारण्याचा संकल्प करण्यात आला. त्याअनुषंगाने भूमीपूजन समारंभ संपन्न झाला.

          याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रावण मोंढे, उपाध्यक्ष व्यंकटी कोहळे, ग्राम पंचायत सदस्य अश्विनी गजभिये, पोलीस पाटील संदीप मेश्राम, ग्राम पंचायत कर्मचारी आनंद चव्हाण, मुख्याध्यापक खुशाल कापसे, सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील, पालक प्रशांत गजभिये, प्रतिष्ठित नागरिक वाघमारे, अंगणवाडी मदतनीस चंद्रकला गजभिये, शा. पो. आ. स्वयंपाकी प्रिया मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. 

          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे गेल्या अनेक वर्षापासून १९ फेब्रुवारी शिवजयंती ते १ मे महाराष्ट्र दिन या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित हसत खेळत शिवचरित्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

           याच उपक्रमाच्या अनुषंगाने शिवचरित्राबरोबरच गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने मुख्याध्यापक खुशाल कापसे आणि सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांचे संकल्पनेतून शाळेच्या राजमाता जिजाऊ शिवराई स्मृती परिसरात किल्ले रायगडची प्रतिकृती साकारण्याची संकल्पना पुढे आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले.