इंद्रायणीमध्ये प्रदुषित सांडपाणी येऊ नये यासाठी संवेदनशीलपणे काम करावे : डॉ.राजेश देशमुख… — इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन..

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : इंद्रायणी नदी हा सर्वांच्या आस्थेचा, प्रथा, परंपरा, श्रद्धेचा विषय असून नदीमध्ये प्रदुषित सांडपाणी येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलपणे याकडे पाहण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व नगरपरिषदांनी आपले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा घालून त्याप्रमाणे कामाला गती देणे आवश्यक आहे असे पूणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले.

         इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम,जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाचे अधिकारी, लोणावळा,वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे,आळंदी नगरपरिषद आणि देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नारायण शिंदे,शिरीष कारेकर,डी.डी.भोसले पाटील,संजय घुंडरे, जनार्दन पितळे,कोमल काळभोर,पुरुषोत्तम महाराज हिंगणकर,अर्जुन मेदनकर,डॉ.सुनिल वाघमारे,अरुण बडगुजर,दादासाहेब कारंडे आदी उपस्थित होते.

       लोणावळा नगरपरिषदेच्या एसटीपीच्या अनुषंगाने रेल्वे क्रॉसिंगबाबत परवानगीसाठी गतीने पाठपुरावा करण्यात येईल. तळेगाव येथील कार्यान्वित न होऊ शकलेल्या एसटीपीचा क्षमतावाढीचा आराखडा तयार करावा. देहू नगरपंचायतीनेही अल्पमुदतीच्या उपाययोजना तात्काळ पूर्ण कराव्यात. आळंदी येथील एसटीपी विहित कालमर्यादेत पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.

         जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, मावळ तालुक्यातील कान्हे ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सांडपाण्यावर अभिनव पद्धतीने प्रक्रिया करुन त्याचा गावातच पुनर्वापर केल्यामुळे नदीमध्ये अजिबात सांडपाणी सोडले जात नाही. कान्हे गावाने केलेल्या उपाययोजना जिल्हा परिषदेने इतरही गावात राबवून नदीत सोडले जाणारे सांडपाण्याचा पुनर्वापर करावा. तसेच नदीकाठच्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के शोषखड्ड्यांचा उपक्रम राबवावा.

         सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता, जलप्रदुषण रोखणे आदीच्या अनुषंगाने दरमहा उपक्रम राबवावेत. त्यात शाळा, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सहभाग वाढवावा. सांडपाणी प्रकल्प आराखडे, उभारणी, निधी आदींच्या अनुषंगाने आवश्यक ते तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक मदत उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. नदी पुनुरुज्जीवनाच्या उपाययोजनांमध्ये पीएमआरडीएलाही सहभागी करुन घेण्यात येईल, असेही यावेळी डॉ.देशमुख यांनी सांगितले.

         यावेळी पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपामार्फत उभारण्यात येत असलेल्या एसटीपी आणि ईटीपीची (इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट) माहिती दिली. मार्च २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुमारे ३१ एमएलडी दैनंदिन सांडपाणी प्रक्रिया क्षमतेचे एसटीपी कार्यान्वित करण्यात येणार असल्याने नदीप्रदुषणमुक्तीसाठी मोठा हातभार लागणार आहे. चिखली येथील अस्तित्वातील प्रकल्पाच्या क्षमतावाढीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. तसेच चिखली येथेचे नव्याने हाती घेतलेल्या १२ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प, भोसरी, भोसरी तलाव, कुदळवाढी येथील प्रकल्पांचे काम गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

       यावेळी नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एसटीपीच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी नदीकाठच्या ग्रामपंचायतींमध्ये उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

       यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने विठ्ठल शिंदे,माजी विरोधी पक्षनेते डि.डि.भोसले,अरुण बडगुजर,शिरीष कारेकर, जनार्दन पितळे यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण कसे होते हे लक्षात आणून दिले.