Home Political ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन…

ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

लातूर : “आपल्या गावाचा, गणाचा आणि गटाचा विकास नेमका कसा असावा, हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठरवत असते. त्यामुळे ही निवडणूक जाती-धर्माच्या नावावर लढण्याची नसून, विकासाच्या मुद्द्यावर लढण्याची आहे. आतापर्यंत विकासाच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवा,” असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

            लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर ताजबंद येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. लातूर येथील जाहीर सभेत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नागरिकांनी सुजात आंबेडकर यांच्या सभेला भरभरून प्रतिसाद दिला.

               सभेला मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि वीज या मूलभूत गरजांचा प्रश्न जिल्हा परिषदेतच सुटतो. दर्जेदार शाळा आणि आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे.

           शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, पीकविमा आणि नुकसानभरपाई यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर काम होणे आवश्यक आहे.

           सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना आवाहन केले की, मतदारांनी भावनिक मुद्द्यांना बळी न पडता केवळ विकासाच्या नावावरच मतदान केले पाहिजे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जनतेच्या हक्कासाठी लढणारे असून, त्यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

           या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. ज्यात अविनाश भोसीकर (राज्य सदस्य), संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक), मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष), आर. के. आचार्य (तालुकाध्यक्ष), कमलाकर चिकटे (ज्येष्ठ नेते), यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.